मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास मतदानकेंद्रे बळकावण्याची शक्यता – मुख्य निवडणूक आयुक्त

1141

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आगामी निवडणुकीमध्ये इव्हीएमवर मतदान घेण्यापेक्षा मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी केली. त्यावर मतपत्रिकेवर मतदान घेणे योग्य ठरणार नाही. कारण पुन्हा मतदानकेंद्र बळकावली जाण्याचे सत्र सुरू होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी सांगितले.

सर्वपक्षीय बैठकीत इव्हीएमबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी रावत म्हणाले की,   इव्हीएमबाबतच्या सर्व राजकीय पक्षांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आयोग गंभीर आहे. निवडणुकीपूर्वी त्या सोडवल्या जातील, असा विश्वास त्यांनी  यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला सर्व ७ राष्ट्रीय आणि ५१ राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे ४१ प्रतिनिधी उपस्थित  होते. काँग्रेस, सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस आणि आपसह इतर विरोधी पक्षांनी मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, अशी  मागणी केली.  यावेळी ‘एक देश एक निवडणूक’ या मुद्यावरही चर्चा झाली. काही पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला तर काहींनी याला विरोध केला.

काही पक्षांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मध्ये काही समस्या असल्याचे निदर्शनास आणून दिले.   याबाबत आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रिया विश्वसनीय आणि सुलभ होण्यासाठी सकारात्मक उपाय सुचवले आहेत. यावर विस्ताराने विचार करत असून प्रभावी पद्धतीने ते लागू करण्याच्या दिशेने पावले उचलली जातील, असे रावत यांनी सांगितले.