मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले, विरोधकांनी येऊन पाहावं, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना डिवचलं

94

जळगाव, दि.1९ (पीसीबी) : महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत डिवचलं आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर देखील गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. मुडंक शिवसेनेचं कंबर भाजपची आणि पाय राष्ट्रवादीचे कुठे चाललंय हे. यामध्ये बदल व्हायला हवा सर्व एकच असायला हवं. राज्यात पालकमंत्री शिवसेनेचा, नगर विकास मंत्री शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा असंच व्हायला हवं, अंस गुलाबराव पाटील म्हणाले.

नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या बाबत बोलण्या एवढी त्यांची उंची नाही. उद्धव साहेबांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना राजकारणात मोठे केले त्यामुळे त्यांनी उद्धव साहेबांविषयी बोलू नये. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं यावर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. शनिवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.