…मग सिंचनाचा पैसा गेला कुठे?  राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांच्या उपस्थिती सवाल  

965

पुणे, दि. १२ (पीसीबी) – अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना साठ वर्षातील आजपर्यंतचा सिंचनाचा पैसा गेला कुठे? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ऱविवार) येथे केला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि अजित पवार उपस्थिती होते.

पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भाषण करताना राज ठाकरे यांनी राजकीय भाषेत चौफेर टोलेबाजी केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की,  जे सर्व सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत नाहीत. पाटबंधाऱ्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती.  पानी फाऊंडेशनला जे जमले तर सरकारला का नाही जमले असा प्रश्नही मुख्यमंत्र्यासमोर उपस्थित केला. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, अमिर तुझे काम ग्रेट आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्वीकारत नाही. पण त्यांनी मॅगँसेस पुरस्कार मिळेल तो स्वीकारावा, अशी विनंतीही यावेळी राज ठाकरे यांनी अमिर खानला केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,  सिनेअभिनेता अमीर खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री  विजय शिवतरे आदी उपस्थित होते.