“…मग पुढच्या संविधान दिनी पंतप्रधान भाषण करणार कुठे?” ; संजय राऊतांचा खोचक प्रश्न

284

मुंबई, दि.२९ (पीसीबी) : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या घरी सध्या लगीनघाई आहे. त्यांची मुलगी विवाहबद्ध होतेय. तिच्या लग्नपत्रिकेवर #PMkishadi असं लिहिलं गेलंय. अर्थातच नव्या जोडप्याच्या नावाची ती पहिली अक्षरं आहेत. आजच्या सामनाच्या संपादकीयमध्येही राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टिका करण्याची संधी सोडलेली नाही. निमित्त अर्थातच मोदींनी संविधान दिनाच्या दिवशी दिलेल्या भाषणाचं आहे. फॅमिली पार्टी कोणाची? असा सवाल करत केंद्रीय नेतृत्वाच्या नियती आणि नीतीवर चाबूक ओढण्याचा प्रयत्न केला गेलाय.

संविधान दिनाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. खास करुन काँग्रेसनं त्याला विरोध केला. त्यामुळे मोदींचं भाषण हे स्वपक्षीय खासदारांसमोरच झालं. विरोधक कुणी नव्हतेच. त्यावर सामनाचं संपादकीय म्हणतं- लोकशाहीचा मुखवटा लावून देशात एकाधिकारशाहीचा सध्या सुरु असलेला खेळ संविधानाच्या विरोधात आहे. संविधानात सत्याचा जय व राष्ट्रहिताला महत्व आहे. ते आज होत आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी संविधान दिनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण दिले. याच हॉलमध्ये स्वातंत्र्याशी नियतीचा करार झाला. मोदी आता नवी संसद निर्माण करीत आहेत. या संसदेत सेंट्रल हॉलच नाही. त्यामुळे पुढच्या संविधान दिनी पंतप्रधान भाषण करणार कुठे?

सामनाच्या संपादकीयमध्ये भाजप हा फॅमिली पार्टी नसल्याचं सांगण्यात आलंय पण एका गटाची तिथं कशी हुकूशाही आहे यावर मात्र भर देण्यात आलाय. संपादक म्हणतात- भाजप ही फॅमिली पार्टी नाही. पण गेल्या काही वर्षात तेथे एका गटाची हुकूमशाही आहे. श्री मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गुजरातच्याच नेत्याला पक्षाचे अध्यक्ष केले. सत्ता व पक्षाची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच आहे. घराणेशाही व पक्षांतर्गत एककल्ली, हुकूमशाही कारभार यात तसे साम्य आहे. संपादकीयमध्ये पुढं असं लिहिलंय- आज नोटबंदी, चीनची घुसखोरी हे प्रकार देशाच्या मुळावर आले तरी भाजपात ब्र काढण्याची हिंमत नाही. ही स्थिती फॅमिली पार्टीपेक्षा भयंकर आहे.

सामनाच्या संपादकीयमध्ये काँग्रेस आणि भाजपची पक्षीय तुलना केली गेलीय. त्यानुसार संपादकीयत असं लिहिलंय- पंतप्रधान मोदी यांनी राजकारणाचे चांगले ज्ञान आहे. पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली, या संकल्पनेवर त्यांनी टीका केली. पण संविधानाला सगळ्यात मोठा धोका लोकशाही माध्यमातून सत्तेवर यायचे व मग हुकूमशाही पद्धतीने राज्य करायचे या प्रकारच्या प्रवृत्तींपासून आहे. काँग्रेस हा लोकशाही मुल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी मतभेद असू शकतात. पण काँग्रेसनं आजच्या प्रमाणे लोकशाहीचे स्तंभ मोडून बाजारात विकायला काढले नव्हते.