मंदिरातील निर्माल्याचे होणार खत; प्रभागातील मंदिरे होणार ‘झिरो वेस्ट’

119

– नगरसेवक अजित गव्हाणे यांचा पर्यावरण पुरक उपक्रम

पिंपरी, दि.13 (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे आणि राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांच्या वतीने नागरिकांच्या धार्मिक भावना जोपासण्यासाठी, पर्यावरणपुरक एक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे भोसरी प्रभाग क्रमांक 5 मधील मंदिरातील निर्माल्य यापुढे घंटागाडीत टाकले जाणार नाही.या निर्माल्याचे जागेवरच खत तयार केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागातील मंदिरांना निर्माल्य कलश दिले आहेत. त्यात खतनिर्मिती केली जाणार आहे. प्रभागातील मंदिरे ‘झिरो वेस्ट’ होणार आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून संकल्प स्वच्छतेचा, सुंदर भोसरीचा या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने डस्टबीनचे वाटप केले.ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृती अभिमान राबविले. त्याच्या दुसऱ्या टप्यात प्रभागातील मंदिरातील निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिक श्रद्धा म्हणून देवाला हार घालतात. फुले वाहिली जातात. फळे ठेवली जातात. परंतु, मंदिरातील हे निर्माल्य घंटागाडीत टाकले जाते. यातून धार्मिक भावना, श्रद्धा जोपासली जात नसल्याची भावना नागरिकांच्या मनात होती.

त्यामुळे निर्माल्यातून खतनिर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्णय अजित गव्हाणे यांनी घेतला. नागरिकांना यामागचा उद्देश, भूमिका सांगितली. नागरीकांनाही या उपक्रमाचे स्वागत केले. खतनिर्मितीसाठी मंदिर व्यवस्थापनाला निर्माल्य कंपोस्ट असे लिहिलेले मोठं-मोठे रांजण दिले आहेत. प्रभागातील संभाजीनगर येथील संत तुकाराम मंदिर, तुकाई माता मंदिर साई सिद्धनगर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाईनगर, स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थ सोसायटी आणि महादेव नगर येथील महादेव मंदिरात निर्माल्य कलशाचे गुरुवारी वाटप करण्यात आले.

अशी केली जाणार खतनिर्मिती!
निर्माल्य कलशात खाली थोडी कोरडी माती टाकली जाईल. हारांचे दोरे काढले जातील. हार पान-फुलं केळीचे साल बारीक करून कलशात टाकले जाईल. त्यानंतर हळद तसेच दही टाकून त्याचे मिश्रण केले जाईल. त्यानंतर 45 दिवसात त्याचे कंपोस्ट खत तयार होईल. हे खत बाग, महापालिका उद्यानातील झाडांना टाकले जाणार आहे. वैशाली अजित गव्हाणे, अर्चना मोरे, यांच्या पुढाकाराने तसेच प्रभागातील सर्व महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक यांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पहिल्या टप्प्यात प्रभागातील सर्व मंदिरात निर्माल्य कलश देण्यात येणार आहे.

नागरिकांच्या धार्मिक भावना जोपासतील, मंदिरे ‘झिरो वेस्ट’ होतील
नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, “घरातील निर्माल्य नदीपत्रात टाकतो. पण, सार्वजनिक मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जात होते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. त्यातून निर्माल्याचे खत निर्माण करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार प्रभागातील मंदिरात निर्माल्य कलशाचे वाटप करण्यात आले. त्यात खतनिर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना जोपासल्या जातील आणि खत निर्मिती होईल. मंदिरे ‘झिरो वेस्ट’ होतील. या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.