मंत्री विजय वडेट्टीवार निवडणुका होऊ देत नसतील तर आम्हीही नोकर भरती होऊ देणार नाही

100

नवी मुंबई, दि. २२ (पीसीबी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा अत्यंत आक्रमक झाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार निवडणुका होऊ देत नसतील तर आम्हीही नोकर भरती होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.

आबासाहेब पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हा इशारा दिला आहे. राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका विजय वडेट्टीवारांची असेल तर त्याच धर्तीवर मराठा क्रांती ठोक मोर्चाही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती होऊ देणार नाही .जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होणार नाही, तोपर्यंत कोणती नोकर भरती होऊ देणार नाही. त्याच प्रमाणे शाळा- कॉलेजची प्रवेश प्रक्रियाही होऊ देणार नाही, असा आसा इशारा पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.

सर्वोच्च न्यायालयान आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाजामधली अस्वस्थता अजून ही कायम आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेलं मूक आंदोलन त्यानंतर त्यांची सरकार सोबत झालेली चर्चा आणि त्यानंतर त्यांनी सरकारला दिलेली महिन्याभराची मुदत यावर समाजातील अनेक घटक नाराज आहेत. राज्यसरकार मराठा समाज आणि खासदार संभाजीराजेची फक्त दिशाभूल करत असल्याचा दावा त्यांचा आहे. त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने ताराराणी चौकात रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात दिसलेला समाजाचा संताप भविष्यातील उद्रेकाची झलक दाखवून गेलाय. शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. त्यामुळे हा परिसर भगवामय झाला होता. ‘मराठा क्रांती मूक मोर्चा नाही, आता मराठा क्रांती ठोक मोर्चा’ अशा टॅगलाईन घेऊन झालेल्या या आंदोलनात सरकारला आता ठोकल्या शिवाय पर्याय नाही, अशा शब्दात समरजित घाटगे यांनी इशारा दिलाय…

कोल्हापुरात तास भर रास्ता रोको –
आज कोल्हापुरातील ताराराणी चौकात जवळपास तासभर रास्ता रोको करून मराठा समाजाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. हेच आक्रमक आंदोलन राज्यभर पोहोचवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. त्यामुळ येत्या काळात हे आंदोलन आक्रमक रूप घेण्याआधी समाजासाठी ठोस उपाय योजनांची कार्यवाही होणं गरजेचं आहे. आज सुरू झालेल्या या रस्त्यावरील आंदोलनाची दखल सरकार कितपत घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र या आंदोलनाच्या निमित्ताने राजघराण्यातील आणखी एका नेतृत्वाची समाजाच्या आंदोलनात एन्ट्री झाली हे मात्र निश्चित.

WhatsAppShare