मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने संपन्न..

147

पुणे, दि. ७ (पीसीबी): राजकीय वर्तुळामध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत, प्रत्येक जण आपल्या मुलीचे लग्न अगदी थाटात लावून देताना दिसत आहे. पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने केला. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह रजिस्टर पद्धतीने विवाह संपन्न झाला.

या प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड भावूक झालेले दिसले. एका बापाच्या भावूक भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होत्या. यावेळी माध्यामांसमोर त्यांनी आपले मन मोकळे केले.
नि:शब्द झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी ” 25 वर्ष आपल्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी आता आपल्या घरात नसणार ही भावनाच खूप वेदनादायी आहे. या कठीण वेळी एखाद बाप काय बोलणार, असे म्हणत त्यांनी त्यांचे डोळे पुसले. किताही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी मन तयार होत नाही. आपल्यावर प्रेम करणारी, वेळेप्रसंगी ओरडणारी मुलगी उद्या घरात नसणार म्हणजे घराचं घरपणच जाणार. लग्न साध्या पद्धतीने व्हावे ही मुलीचा इच्छा होती म्हणूनच या पद्धतीने लग्न करण्यात आले आहे. अशी माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी दिली.
जितेंद्र आव्हाडांचा जावई एलन पटेल हा त्यांची मुलगी नताशाचा बालमित्र आहे. इयत्ता पहिली पासूनच ते एकत्र शिकत होते. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं असून एलन पटेलचे शिक्षण एमएस अन फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलन पटेल स्पेनमधली मल्टीनँशनल कंपनीत कामाला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं असून मतदारसंघातल्या लोकांसाठी लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
या विवाह सोहळ्यात मोजकेच पाहुणे उपस्थित होते. गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांनी मुलीचे लग्न साधेपणाने करणे आदर्शवत आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच घरगुती पद्धतीने गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर गोंधळाचे फोटो शेअर केले होते. यावेळी ते भावूक होताना दिसले होते. यावेळी एका राजकीय नेत्याची ही हळवी बाजूही सर्वांसमोर आली. अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.