मंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका; माजी मंत्र्यांचे राज्यपालांना पत्र  

187

धुळे, दि. ६ (पीसीबी) –  राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केला आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास, जयकुमार रावल आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आरोपी करावे, अशा आशयाचे पत्र  माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख यांनी राज्यपालांना पाठवले आहे, याबाबतची माहिती देशमुख यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

जयकुमार रावल यांच्यापासून आपल्या जीविताला धोका आहे, खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकायचे, तेथे विषप्रयोग करुन किंवा अन्य अनैसर्गिक मार्गाने मृत्यू आल्यास अथवा माझ्यावर मारेकरी घालून गोळ्या घेतल्या तर यात पहिले आरोपी जयकुमार रावल, दुसरे आरोपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करुन इतरांना आरोपी करावे”, असे गंभीर आरोप हेमंत देशमुख यांनी केले आहेत. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्रही पाठवले आहे.

दरम्यान, दोंडाईचा नगर परिषदेच्या नव्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच हेमंत देशमुख समर्थकांनी या इमारतीचे उदघाटन केले होते. या घटनेवरुन दोंडाईचातील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्दही झाला होता. मुख्यमंत्र्यांचा दोंडाईचा दौरा मराठा आरक्षण आंदोलनामुळे रद्द झाला, असा दावा हेमंत देशमुख यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केला.