मंगळवार पेठेतून चोरीच्या तीन दुचाकींसह तिघांना अटक

15

पुणे, दि. २८ (पीसीबी) –  मंगळवार पेठेतून चोरीच्या तीन पल्सर दुचाकींसह तीघाजणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास करण्यात आली.  

ऋषीकेश संजय मुळीक (रा.अनपटवाडी , ता.कोरेगाव, जि. सातारा), शुभम सनिल बोडरे (रा. आदर्की , ता. फलटण, जि.सातारा) आणि सुमीत नाना भंडलकर (रा. राजापूर, ता. भोर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या वाहन चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास पुण्यातील मंगळवार पेठ येथे तीन पल्सर गाड्या घेऊन संशयितरित्या उभ्या असलेल्या तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.  परंतु, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्या दुचाक्या पुणे शहर, जेजुरी आणि वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे ,पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस उपायुक्त समिर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम आणि पोलीस कर्मचारी दिनेश पाटील, सचिन जाधव, मेहबूब मोकाशी , सुभाष पिंगळे , राजू पवार, प्रकाश लोखंडे यांच्या पथकाने केली.