मंगलाताई…..सीमाताई…..आशाताई…..सुलभाताई…..चौघीही राजकारण गाजवताहेत!

637

माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका सुलभा उबाळे, या चार महिलांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर आपला ठसा ठळकपणे उमटवला आहे. सद्यःस्थितीत पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात महिला नेतृत्वाची वानवा नसल्याचे दिसत आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महिला राजकीय पातळीवर कुठेही मागे नसल्याचे चित्र आहे.

एकेकाळी आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख होती. तसेच आमदार अजितदादा पवार यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून राज्याच्या राजकारणात पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख आहे. त्यामुळे या शहरातील राजकीय घडामोडीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. शहराचे राजकारण येथील महिलांनीही गाजवले आहे. विशेषतः माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, शिवसेना माहिला आघाडी शहर संघटिका सुलभा उबाळे या चार महिलांनी शहराच्या राजकारणावर आपला ठसा ठळकपणे उमटवला आहे.

लोकसभा आणि विधानसभेत पिंपरी-चिंचवडमधील एकही महिला लोकप्रतिनिधी नाही. तरीही संधी मिळाल्यास लोकसभा आणि विधानसभा गाजवण्याची कदम, सावळे, धायगडे-शेंडगे आणि उबाळे यांच्यात राजकीय धमक आहे. मंगला कदम यांनी महापौर म्हणून आपली राजकीय कारकिर्दी गाजविली आहे. त्या मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सत्तारूढ पक्षनेत्या होत्या. त्यांनी पाच वर्षे हे पद यशस्वीपणे सांभाळले. एक वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पॅनलमधील तीनही सहकाऱ्यांचा पराभव झाला तरी त्या त्यांच्या कामाच्या जोरावर पुन्हा निवडून आल्या आहेत. आता त्या महापालिका सभागृहात सत्ताधारी भाजपला घाम फोडण्याचे काम करत आहेत.

स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे या शहरातील सर्वाधिक चर्चेतील महिला राजकारणी आहेत. सलग दहा वर्षे विरोधक म्हणून आणि आता सत्ताधारी म्हणून त्या आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. आजमितीला महापालिकेचे राजकारण सीमा सावळे यांच्या भोवतीनेच फिरत असल्याचे राजकीय चित्र आहे. शहरातील विरोधक सत्ताधारी भाजपपेक्षा सीमा सावळे यांना कसे अडचणीत आणता येईल, याचीच व्यूहरचना आखत असतात. परंतु, विरोधकांनी कितीही आणि कसलीही राजकीय व्यूहरचना आखली तरी ती भेदण्याची ताकद असणाऱ्या राजकारणी म्हणून सीमा सावळे यांच्याकडे पाहिले जाते. नेतृत्व आणि वक्तृत्वाच्या गुणांमुळे विरोधक सीमा सावळे यांना टरकून असतात. शहराच्या राजकारणात त्यांनी आपले स्वतंत्र वलय निर्माण केले आहे. त्या वलयामुळेच आगामी निवडणुकांमध्ये शहरातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळू शकतो, असा राजकीय अंदाज वर्तविला जात आहे.

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे या दुसऱ्यांदा महापालिकेत लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. मुळातच शिक्षिका असलेल्या आशा धायगुडे-शेंडगे यांनी प्रथमच नगरसेविका झाल्यानंतर मागील पंचवार्षिकमध्ये लक्षवेधी काम केले होते. अभ्यासू विरोधक म्हणून त्यावेळच्या सत्ताधारी राष्ट्रवादीला घाम फोडण्याची क्षमता असलेल्या राजकारणी म्हणून त्यांनी चमकदार काम केले. आता सत्ताधारी पक्षाच्या म्हणून त्या सभागृहात विरोधकांना जशास तसे उत्तर देणाऱ्या नगरसेविका बनल्या आहेत. संधी मिळाली की स्वतःच्या नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या त्या नगरसेविका आहेत.

शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका सुलभा उबाळे या सुद्धा शहराच्या राजकारणातील चर्चेतील महिला आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता प्रत्येकवेळी दिसून आले आहे. उबाळे यांनी महापालिकेत शिवसेनेच्या गटनेत्या म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनवेळा आमदारकी लढविली आहे. परंतु, दोन्हीवेळा त्यांना अपयश आले. आता त्या महापालिकेच्या राजकारणात नसल्या तरी, पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर त्या आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत.