“भ्रष्ट कारभारामुळे भाजपने गरिबांच्या स्वप्नावर पाणी फेरले”: आवास योजना रखडल्याने संजोग वाघेरे पाटील यांचा हल्लाबोल

79

– पंतप्रधान आवास योजना राबविण्यात भाजप ठरले अपयशी

– पाच वर्षात एकही प्रकल्प पूर्ण न झाल्याचे वास्तव

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) -: सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे पंतप्रधान आवास योजना शहरात यशस्वीपणे राबविता आली नाही. पाच वर्षात कोणताही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. शहरात आवास योजनेतूनही एकही घर कोणाला मिळाले नाही. त्यामुळे गोर-गरिबांच्या घराच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे‌ पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खोट्या भुलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शहरातील कारभा-यांना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. हे वारंवार सिध्द होत आहे. त्यांचे राज्यातील नेते शहराकडे दुर्लक्ष करतात. तर शहरातील नेते भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत. पंतप्रधान आवास प्रकल्पातून वर्षात लोकांना घरे देण्याची वल्गना सत्ताधारी भाजपने केली होती. त्या आवास योजनेच्या प्रकल्पात सत्ताधारी भाजपने ज्यादा दराने कंत्राटे देऊन भ्रष्टाचार सुरु केला. परिणामी, भ्रष्टाचार व टक्केवारीमुळे पिंपरी चिंचवडमधील पंतप्रधान आवास योजनेचा भाजपने खेळखंडोबा केला.

रावेत येथे १,०८० घरे बांधण्यासाठी पिपंरी-चिंचवड महानगरपालिकेने मे. मन इन्फ्रा. कन्स्ट्रक्शन लि. या कंपनीला कंत्राट दिले होते. या कामासाठी एकूण ७९,४५,९२,७९० रुपयांची निविदा काढण्य़ात आली होती. परंतु, सुमारे ९ कोटी रुपये ज्यादा दराने हे काम दिले गेले. ३० मे २०१९ रोजी वर्कऑर्डर दिलेल्या या कामाला ३० महिन्यांची मुदत होती. ही मुदत संपुष्टात आली असून प्रकल्पाचे फक्त १ टक्का काम पूर्ण झाले आहे. जागा ताब्यात नसताना निविदाप्रक्रिया का राबविली ? मा. न्यायालयाचे स्थगिती आदेश असताना सत्ताधारी भाजपने श्रेय लाटण्यासाठी १,०८० घरांसाठी सोडत का काढली ? त्यावेळी गरिबांची दिशाभूल होऊ नये, म्हणून या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. आजही रावेत प्रकल्प जैसे थे स्थितीत आहे.

केवळ राजकीय श्रेय लाटण्याकरिता भाजपने सोडत काढून धुळफेक केली. वास्तविक आज हा प्रकल्प होईल किंवा नाही, हा प्रश्न समोर आहे. त्यांची एकप्रकारे फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी भाजपने केले आहे. सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून अधिकारी, सल्लागारांनी चुकीचे नियोजन केल्यामुळे हा प्रकल्प फसला. याकरिता सर्वस्वी सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

– च-होली, बो-हाडेवाडी आवास प्रकल्प अर्धवट, भाजप जबाबदार
पंतप्रधान आवास योजनेतील च-होली व मोशीतील बो-हाडेवाडी येथील प्रकल्प रखडले आहेत. च-होलीत १४४२ घरे असून हे काम देखील मे. मन इन्फ्रा. कन्स्ट्रक्शन लि.कंपनीकडे आहे. कामसाठी एकूण १३२,५०,००,००० रुपये इतका खर्च अदा केला जाणार आहे. या कामाची मुदत ऑक्टोबर २०२० मध्ये संपलेली असताना हे काम मुदतवाढीवर सुरू आहे. तरीही केवळ ३५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. बो-हाडेवाडी येथील १,४०० घरे बांधण्याचे काम मे. एस. जे. कॉन्ट्रॅक्टस प्रा. लि. कंपनीकडे आहे. त्यासाठी एकूण ११२,१९,२३,४०६ इतका खर्च अदा केला जाणार आहे. येथे देखील केवळ ५५ टक्के काम झाले आहे. या मोठ्या प्रकल्पापैकी एकही प्रकल्प सत्ताधा-यांना पूर्ण करता आलेला नाही. त्यांनी गतिमान कारभाराच्या नावाखाली केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केले, अशी टीका संजोग वाघेरे‌ पाटील यांनी केली आहे.