भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवडचे काय झाले; अमोल कोल्हे यांचा भाजपाला खडा सवाल

182

पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त असलेली १० कामे दाखवा

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त असलेली १० कामे दाखवा, परत पिंपरी चिंचवडमध्ये पाय ठेवणार नाही, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला दिले. भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवडचे काय झाले, असा जाहीर सवाल त्यांनी भाजपाला केला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत, अजित पवार यांना या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. पिंपरी चिंचवड म्हटल्यावर अजित पवार यांचे नाव येते. आज पिंपरी चिंचवडचे दोन भाग झालेत, आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे काय झाले याचा जाब विचारला पाहिजे. २०१७ मध्ये आश्वासनांचा पाऊस केला होता, पण नंतर समजले की ते गाजर होते. भ्रष्टाचाराच्या एका गूढ प्रकऱणावर बोलताना शोधपत्रकारांना शोध घ्यावा की, २०१७ नंतर २०२१ मध्ये आता राजस्थानात या शहराची चर्चा कशाबद्दल होते आहे. आता ती कथा मी सांगणार नाही,

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, २०१७ च्या निवडणुकित देवेंद्र फडणवीस यांनी इथे येऊन आश्वासने दिली, पण त्यांची पूर्तता करू शकले नाहीत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम झाले. आता आपले भवितव्य आपल्या हातात आहेत. शरद पवार यांनी सत्तेची पदे अनेकांना दिली आणि मोठे केले. कोणाला मंत्री केले, आमदार, खासदार केले, महापौर केले. इतके सगळे केल्यानंतर महापालिका गेल्या वेळी आपल्या हातातून का गेली याचा विचार केला पाहिजे.

एचए कंपनीला ५५० कोटींची मदत पवार यांच्यामुळे –
कामगार नेते अरुण बाऱ्हाडे म्हणाले, आज पवार साहेबांनी जाणीवपूर्वक येथील कामगारांच्या व्यथा जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. एचए चे नेतृत्व करत असताना त्यांनी २४ वर्षे सतत मदतीचा हात ठेवला. २००२ मध्ये केंद्र सरकारने हा कारखाना बंद करायचे ठरवले होते. पण पवार साहेबांमुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात १४० कोटींचे पॅकेज मिळाले. नंतर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनही त्यांनी मदत केली. २०१४ मध्य अचानक काराखाना शांत झाला. कामगारां बांधवांनी एक चूक केली आणि त्याचा परिणाम झाला. १६ महिने कामगार पगारापासून वंचित होता. शरद पवार साहेबांना मी रात्री १ वा. ईमेल केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रात्री १.१५ माझ्या मेलवर त्यांनी रिप्लाय दिला आणि मुंबईत बोलावून घेतले. सर्व एकून घेतले आणि आमच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला. कामगारांच्या तळमळीपोटी हे केले. त्यावेळी आमचे प्रपोजल होते, ६० कोटींचे होते, पण १०० कोटींचे प्रपोजल केले आणि कारखान्याला जीवदान मिळाले. आता पुढे काय, हा प्रश्न होता. नितीन गडकरी आणि दिवंगत मंत्री अनंतकुमार यांची कमिटी नेमली होती. साहेबांच्या घरी ती बैठक झाली. २८० कोटींचे प्रपोजल बनवले. अशा प्रकारे जवळपास जवळपास ५५० कोटी रुपये मिळवून दिले म्हणून एचए कंपनीचा कारखाना तगला आहे. बजाज, सेंच्युरी एन्काचा प्रश्न पवार साहेबांनी मिटवला. मात्र, हे करत असताना आजचे चित्र अत्यंत दुर्दैवी, दयनीय आहे. आता कामगारांच्या पाठिशी हात ठेवायला कोणी नाही. कामगारांना वाली नाही. कामगारांना लाचार करण्याचे काम चाललेय, अशी टीका बोऱ्हाडे यांनी केली.

WhatsAppShare