भोसरी बीआरटी टर्मिनल्स येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा : स्थायी समिती सभापती नितीन लांडगे

49

– पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना आदेश

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – भोसरी बीआरटी टर्मिनल्स येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करा, असे आदेश स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रहदारीचे असणारे भोसरी गाव आहे. भोसरी तून पुणे-नाशिक रस्त्याला जोडले जाते.तसेच आळंदी कडे जाणारा रस्ता ही भोसरी मधून असल्याने या भागात वाहतुकीची प्रचंड गर्दी असते.

भोसरीत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या ठिकाणी पूल देखील उभारण्यात आला. मात्र वाहतुकीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. भोसरीतील बीआरटी टर्मिनल्स च्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी होत आहे. तसेच वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या ठिकाणी राजगुरुनगर, मंचरकडे जाणाऱ्या बस उभ्या असतात. तसेच पुण्याकडे जाणाऱ्या बसचा थांबा देखील येथेच आहे. त्यामुळे प्रवाशांची येथे सतत ये-जा असते. या भागात रिक्षा तसेच छोटे किरकोळ विक्रेते देखील उभी असल्याने वाहतुकीत भर पडते. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येकालाच करावा लागत आहे, त्यामुळे ही गंभीर समस्या लक्षात घेऊन तातडीने याबाबत उपाययोजना कराव्या, असे आदेश सभापती नितीन लांडगे यांनी दिले आहेत.