भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी; तोतया इन्स्पेक्टरला अटक

126

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – आपण भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असून माझ्यासोबत असलेला व्यक्ती हा माझा कॉन्स्टेबल आहे, असे सांगून दोघांनी मिळून एका स्नॅक्स सेंटर चालकाकडे खंडणी मागितली. पोलिसांनी या तोतया इन्स्पेक्टरला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी दिघी रोड भोसरी येथे घडली.सागर मालूजीराव ताटे (वय 33, रा. गवळी नगर, श्रीराम कॉलनी, भोसरी) असे अटक केलेल्या तोतया पोलीस इन्स्पेक्टरचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार माम्या वैरागे (वय अंदाजे 30, रा. गवळीनगर, श्रीराम कॉलनी, भोसरी) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 384, 34 नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्याम अंकुश शिंदे (वय 28, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दिघी रोड भोसरी येथे जय तुळजाभवानी स्नॅक्स सेंटर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी शिंदे यांच्या तुळजाभवानी स्नॅक्स सेंटर या हॉटेलवर आले. आरोपी सागर याने तो भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. तर आरोपी माम्या हा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल असल्याचे सांगितले.पोलीस असल्याची बतावणी करून आरोपींनी फिर्यादी शिंदे यांच्याकडे धंदा करण्यासाठी दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. शिंदे यांनी पोलिसांना घटनेची माहिती देऊन पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तोतया इन्स्पेक्टर सागर ताटे याला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार पळून गेला असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare