भोसरी पोलिसांची मोठी कारवाई: साडेआठ लाखांच्या दुचाक्या जप्त; दुचाक्या चोरणारी टोळी गजाआड

1205

भोसरी, दि. २३ (पीसीबी) – शहर परिसारातून दुचाकी चोरून त्या विविध ठिकाणी विकणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून ऐकून ८ लाख ५५ हजार रुपयांच्या २० दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपींनी भोसरीतील एका माजी पोलीस कर्मचाऱ्याची बुलेट देखील चोरली होती ती देखील या कारवाई दरम्यान हस्तगत करण्यात आली आहे.

रामेश्वर विलास खंदारे (वय २५), अनिल तबा काळे (वय १९), ओंकार रमेश चव्हाण (वय २१), रामेश्वर परमेश्वर भिसे (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड ग्रामीण आणि शहरी भागातील घरासमोरील तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी हँडल लॉक तोडून आरोपी चोरायचे. दुचाकी ग्रामीण भागात तसेच शहरी भागात कमी किंमतीत विकायचे तर यातील काही आरोपी हे दुचाकी वापरून सोडून द्यायचे. आरोपींकडून ८ लाख ५५ हजार रुपयांच्या ऐकून २० दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये एक बुलेट ही भोसरी पोलीस कर्मचाऱ्याची असून आता ते सेवा निवृत्त झाले आहेत.  या टोळीचे ११ गुन्हे भोसरी पोलिसांनी उघड केले आहेत.