भोसरीत विवाहित शिक्षिकेच्या व्हॉट्अॅप क्रमांकावर अज्ञाताने पाठवले अश्लील मेसेज; गुन्हा दाखल

1123

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – भोसरीतील शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या विवाहित महिलेच्या व्हॉट्अॅप क्रमांकावर अश्लील मेसेज पाठवल्याने अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) दुपारी अडीचच्या सुमारास भोसरीतील शाळेत घडली.

याप्रकरणी पिडीत विवाहित शिक्षिकेने आणि पतीने तातडीने दिघी पोलीस ठाण्यात धाव घेऊन (मो.क्र ९३७०९६९३५६)  या मोबाईल धारकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या दिघीत राहत असून भोसरीतील एका शाळेत शिक्षिका आहेत. गुरुवारी त्या शाळेत गेल्या असता दुपारी अडीचच्या सुमारास ९३७०९६९३५६ या मोबाईल क्रमांकावरुन त्यांना अश्लील मेसेज पाठवण्यात आले. यावर घाबरलेल्या शिक्षिकेने याची माहिती पतीला दिली. त्यानंतर पिडीत महिला आणि त्यांच्या पतीने दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र गुन्हा भोसरीत घडला असल्याने हे प्रकरण भोसरी पोलिस ठाण्यात वर्ग केला असल्याची माहिती दिघी पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम यांनी दिली. सध्या हा मोबाईल नंबर ट्रेस करण्याचे काम सुरु आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.