भोसरीत मिनी बसच्या धडकेत १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

558

प्रभात फेरीसाठी निघालेल्या एका १२ वर्षीय बालकाला मिनी बसने दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.१२) पहाटे साडेसहाच्या सुमारास कासारवाडी येथीत नाशिक फाटा ओव्हर ब्रिजवर, बी.आर.टी रस्त्यावर घडली.

प्रतिक परमेश्वर सावंत (वय १२, रा. पिंपळेगुरव) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुरज चंदनशिवे (वय २२, रा. आनंदनगर, पिंपळेगुरव) याने अज्ञात पांढऱ्या रंगाच्या मिनी बस चालकाविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रतिक सावंत हा गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सुरज चंदनशिवे याच्या सोबत प्रभात फेरीसाठी निघाला होता. यावेळी ते दोघे कासावाडी येथील नाशिक फाटा ओव्हर ब्रिजवरुन पायी जात होते. इतक्यात भरधाव वेगाने आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या मिनी बसने प्रतिक याला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बसचालक बससह घटना स्थळावरुन फरार झाला. भोसरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.