भोसरीत पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा

150

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – पत्नीला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याप्रकरणी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह (एपीआय) त्याच्या आईवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हिंगोलीतील हट्टा पोलीस ठाण्यातून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

विकास देशमुख असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. ते सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी देशमुख यांचे मेहुणे सुधीर विठ्ठलराव भवर (वय ३९, रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. १६ मे २०१९ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सुधीर त्यांच्या बहिणीला घेऊन सासरी सोडण्यासाठी आले. देशमुख हे भोसरीमधील अधिकारी निवास पोलिस लाईन येथे राहतात. त्यावेळी देशमुख यांनी सुधीर यांना शिवीगाळ केली. तसेच सुधीर यांच्या बहिणीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने डोक्यात मारले. यामध्ये सुधीर यांची बहिण गंभीर जखमी झाली. याबाबत सुधीर यांनी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.हट्टा पोलीस ठाण्यातून हा गुन्हा भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.