भोसरी येथे एका वकीलाची कार आडवून त्याची लुटमार केल्या प्रकरणी गुन्ह्यातील हल्लेखोरांचा तपास करत असताना पोलीसांनी हल्लेखोरांकडून लुटलेला मुद्देमाल जप्त करुन  त्यांच्या एका साथीदाराकडून चोरीच्या तीन दुचाक्या जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी अतुल मुरलीधर नाईक (वय २३, रा. राधानगरी, सी-१, दिघी रोड, भोसरी), आकाश महादेव काळपांडे (वय २४, रा. सावंतनगर, शिवनगरी कॉलनी, दिघी), गोकुळ कृष्णा निखाडे (वय २२, रा. महाराष्ट्र कॉलनी, आळंदी रोड, भोसरी), शुभम बाबुराव तायडे (वय  १९, रा. महादेव कॉलनी, भोसरी), राजकुमार उमाजी डामसे (वय २०, रा.बनकर वस्ती, मोशी), जगदीश दिगंबर इंगळवाड (वय १८, रा. मोई, खेड) यांना वकीलाची लुटमार केल्या प्रकरणी तर अलंकार प्रेम कांबळे (वय २२, रा.खडकी बाजार, पुणे) या त्यांच्या साथीदाराला तीन दुचाक्या चोरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वकीलाची गाडी विनाकारण अडवून त्याला जबर मारहाण करत त्याच्या जवळील दोन तोळ्याची सोन्याची चैन, एक मोबाईल फोन व रोख रक्कम ७ हजार ५०० रुपये काही अज्ञात दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावत असताना एका गुप्त बातमीदाराकडून संबंधीत गुन्ह्यातील पाच ते सहा आरोपी हे दिघी येथील शिवनगरी कॉलनी येथे येणार असल्याचे खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली. यावर पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचून वरील सहाजनांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दरोड्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून संबंधीत गुन्ह्यातील चोरी केलेली दोन तोळ्याची सोन्याची चैन, एक मोबाईल फोन व रोख रक्कम ७ हजार ५०० रुपये व गुन्ह्यादरम्यान वापरण्यात आलेली कार असा एकूण ५ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधीत आरोपींनी हिंजवडी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची देखील कबूली दिली आहे. यावेळी आरोपींनी त्यांचा साथीदार अलंकार प्रेम कांबळे या सराईत दुचाकी चोराची माहिती पोलीसांना दिली. त्यावर पोलीसांनी कांबळे याला खडकीतून अटक केली तसेच त्याच्याकडून एकूण ९३ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाक्या जप्त केल्या आहेत. या दोन्ही गुन्ह्यातून पोलीसांनी एकूण ६ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सतीश पाटील, भोसरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ  पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी महादेव धनगर, विनायक म्हसकर, गणेश हिंगे, गणेश आव्हाळे, नितीन खेसे, संतोष महाडीक, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, समीर रासकर यांच्या पथकाने केली आहे.