भोसरीत ट्रँकर – दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

179

भोसरी, दि. २ (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावर टँकर दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भोसरीतील धावडेवस्तीजवळील बिकानेर स्वीटसमोर घडली.

तुकाराम रंगनाथ झपके (वय ५८, रा. गणेशनगर, बोपखेल) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम झपके हे त्याच्या दुचाकीवरून पुणे – नाशिक महामार्गावरून धावडेवस्ती परिसरात विरुध्द दिशेने येत होते. त्यावेळी समोरून आलेल्या पाण्याच्या टँकरची व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने झपके यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.