भोसरीत एसटीचालकाला मारहाण करणाऱ्या कारचालकाला अटक

50

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – “मला पुढे जाण्यासाठी गाडी का थांबवली नाही”, असे म्हणून एका कार चालकाने एसटीचालकाला शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना मंगळवार (दि.१२) सकाळी पावणेदहाच्या सुमारास भोसरीतील नाशिक पुणे रोड येथील बाबर पेट्रोल पंपासमोर घडली.

सिध्देश्र्वर मधुकर आघाव (वय ३४, रा. एसटी डेपो, नारायाणगाव ता. जुन्नर) असे जखमी एसटी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजीत रमाकांत बोराटे (रा. बोराटेवस्ती, तबाजीनगर, देहुरस्ता, मोशी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्देश्र्वर हे एसटी चालक आहेत. ते खिरेश्र्वर ते नारायाणगाव (बस क्र.एमएच/१४/बीटी/६२३) ही एसटीबस चालवतात. मंगळवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ते ही बस घेऊन भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपासोरुन जात होते. यावेळी आरोपी अभिजीत याने त्याच्या ताब्यातील स्वीफ्ट कार (क्र. एमएच/१२/पीएच/४६९४) ही कार बसच्या आडवी लावली. तसेच सिध्देश्वर यांच्या जवळ येऊन, “तु तुझी गाडी का नाही थांबवली, मला पुढे जायचे होते”, असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपी कारचालक अभिजित याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सावर्डे तपास करत आहेत.