भोसरीतील दुकान चालकाला सेल्समेननेच गंडवले; दीड लाखाच्या मालाची केली परस्पर विक्री

458

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – श्री प्रकाश मल्टी ट्रेडर्स दुकानातील मालाची परस्पर विक्री करून सेल्समनने दीड लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार  एप्रिल २०१६ ते  जुलै २०१७ या कालावधीत भोसरी येथे घडला.

या प्रकरणी मालक मयूर पोपटलाल पगारीया (वय ३९, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाहबाज रशिद मुतवली (वय २५, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पगारीया यांचे नाशिकरोड येथे श्री प्रकाश मल्टी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात मुतवली सेल्समन म्हणून कामाला होता. त्याने एप्रिल २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत मालाची परस्पर विक्री केली. या सुमारे १ लाख ५० हजाराचा अपहार केल्याचे समोर आले आहे.  भोसरी पोलीस तपास करत आहेत.