भोसरीच्या राजकारणाची कूस बदलतेय; जालिंदर शिंदेंकडून महेश लांडगे, विलास लांडेंना विधानसभेचे उघड आव्हान

0
27459

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात राजकारणाची कूस बदलत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच काही नवीन चेहऱ्यांनी राजकीय शड्डू ठोकण्यास सुरूवात केली आहे. महापालिका निवडणुकीत पराभूत होऊनही भोसरीच्या राजकारणात आपला प्रभाव टिकवून असलेले माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी विधानसभेचे लक्ष्य समोर ठेवले आहे. शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. ते कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढविली तरी या मतदारसंघात निवडणूक निकालाचे चित्र पालटणार आहे. त्यामुळे शिंदे कोणाला घायाळ करणार आणि कोणाला चितपट करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जालिंदर शिंदे यांनी २००७ च्या महापालिका निवडणुकीत स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांचा घाम फोडला होता. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१२ मध्ये ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत जालिंदर शिंदे हे भाजपकडून इच्छुक होते. त्यावेळी शिंदे हे आमदार महेश लांडगे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक होते. परंतु, गावकी-भावकीच्या राजकारणामुळे भाजपचे तिकीट मिळणार नसल्याचा राजकीय अंदाज येताच शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविली. या निवडणुकीतही त्यांनी भोसरी गावठाणात भाजपचा घाम फोडला होता. परंतु, त्यांचा निसटता पराभव झाला. महापालिका निवडणुकीत पराभूत होऊनही जालिंदर शिंदे आपला राजकीय प्रभाव कायम टिकवून आहेत.

त्यामुळेच त्यांनी आता लक्ष्य २०१९ विधानसभेचा नारा दिला आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केले आहे. फ्लेक्सबाजी व गाठीभेटींच्या माध्यमातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय ताकद दाखवण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला आहे. शिंदे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा भोसरीच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिंदे हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे या दोघांचीही राजकीय डोकेदुखी वाढणार आहे. शिंदे यांच्या उमेदवारीमुळे भोसरीगावातील मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महेश लांडगे आणि विलास लांडे या दोघांवर नाराज असलेले स्थानिक पुढारी शिंदे यांच्या बाजूने झुकल्यास या मतदारसंघातील राजकीय चित्र पालटायला वेळ लागणार नाही.

जालिंदर शिंदे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वाढदिवसानिमित्त केलेल्या राजकीय शक्तीप्रदर्शनाला खडकवासल्याचे दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. सायली वांजळे यांनी जालिंदर शिंदे यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांच्या विधानसभेच्या तयारीने भोसरी मतदारसंघाच्या राजकारणाची कूस बदलत असल्याचे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे शिंदे हे खरोखरच विधानसभेची निवडणूक लढवणार का?, कोणत्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवणार?, त्याचे भोसरीच्या राजकारणावर कोणकोणते परिणार होणार?, शिंदे यांच्या उमेदवारीने कोण घायाळ होणार आणि कोण चितपट होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.