भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा राजकीय खेळ होणार खल्लास?

248

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडवर सलग दहा वर्षे राज्य केलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची भविष्यातील राजकीय वाट बिकट बनली आहे. पक्षाने आधी विधान परिषदेला आणि आता लोकसभेलाही लांडे यांना डावलले. सहा महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीला विजय मिळेल, अशी स्थिती नाही. तसेच राष्ट्रवादी पुन्हा राज्याच्या सत्तेत परतेल आणि लांडे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन होईल, याची खात्री नाही. त्यामुळे लांडे हे राजकारणाबाहेर फेकले जाऊन त्यांचा राजकीय खेळ खल्लास होण्याच्या मार्गावर असल्याचे जाणकारांचे मत आहे. तसे होऊ नये यासाठी लांडे आगामी काळात कोणते राजकीय डावपेच खेळतात आणि आपले अस्तित्व जिवंत ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विलास लांडे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील एकेकाळचे दिग्गज नाव. त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा (२००४, २००९) विजय मिळवला होता. एवढेच नाही तर आमदार होण्याआधी त्यांनी शहराचे महापौरपदही भूषविले. आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी मोहिनी लांडे यांनाही शहराचे महापौर केले. त्यामुळे लांडे हे शहरातील वजनदार नेते म्हणून ओळखले जात. परंतु, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या राजकीय अस्तित्वाला ओहोटी लागली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना करिष्मा दाखवता आला नाही.

महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. पुत्र प्रेमापोटी त्यांनी मतदारसंघात कमी लक्ष दिल्याने राष्ट्रवादीचे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे म्हणजे ९ नगरसेवक निवडून आले. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर लांडे यांना विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी लांडे यांना अर्ज माघार घेण्यास भाग पाडले.

त्यानंतर लांडे यांना पक्षाकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची आशा होती. परंतु, ती ही फोल ठरली. त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना तयारी करण्याची सूचना पक्षाने केली. त्यानुसार त्यांनी संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करून गाठीभेटींना वेग दिला होता. तसेच शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर थेट टिका करण्यासही लांडे यांनी सुरूवात केली होती. परंतु, लांडे यांचा पक्षाकडून पुन्हा घात झाला. अभिनेते व शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांना आयात करून राष्ट्रवादीने शिरूरची उमेदवारी दिली.

त्यामुळे लोकसभेच्या तयारीला लागलेल्या लांडे यांना पुन्हा माघार घ्यावी लागली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लांडे यांचे राजकीय चक्र उलटे फिरू लागल्याने त्यांची पुढची वाटचाल बिकट झाली आहे. आता सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होईल. या आगामी निवडणुकीत विलास लांडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भोसरी मतदारसंघाच्या मैदानात उतरल्यास त्यांचा विजय होण्यासारखी राजकीय स्थिती नाही. तसेच राष्ट्रवादी पुन्हा राज्याच्या सत्तेत परतेल आणि लांडे यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन होईल, याचीही खात्री देता नाही. त्यामुळे लांडे हे राजकारणाबाहेर फेकले जाऊन त्यांचा राजकीय खेळ खल्लास होण्याच्या मार्गावर असल्याचे जाणकारांचे मत आहे. तसे होऊ नये यासाठी लांडे आगामी काळात कोणते राजकीय डावपेच खेळून आपले अस्तित्व जिवंत ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.