भोंग्याचा मोठा फायदा मनसेलाच – प्रत्येक महापालिकेत ४-५ जागा मिळतील

30

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुकारलेल्या आंदोलनाचा त्यांना आगामी काळातील निवडणुकांमध्ये खूप मोठा फायदा होईल. राज्यातील प्रत्येक महागनरपालिकेत मनसेचे ४ ते ५ नगरसेवक निवडून येऊ शकतात, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे. मात्र, भोंग्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप दोघेही अडचणीत येतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

भोंग्यांच्या नाटकात कुणाचा फायदा झाला असेल तर तो राज ठाकरे यांचा झाला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का लागला आहे. पण भाजपलाही याचा फटका बसेल. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा भाजपला धक्का बसला नाही, असे भाजप म्हणत असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांनी सायनमध्ये सभा का घेतली, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतही मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मशिदींवरील भोंगे न उतरल्यास त्याठिकाणी जाऊन लाऊडस्पीकरवरून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मात्र, मनसेच्या या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी हजारो मनसैनिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. अनेक कार्यकर्त्यांना १४९ कलमातंर्गत नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. तर काही जणांना मुंबई सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते.

मनसेच्या या आंदोलनानंतर राज्यातील बहुतांश मशिदींमध्ये पहाटे सहा वाजण्यापूर्वीची स्पीकरवरून होणारी अजान बंद झाली. वाद टाळण्यासाठी अनेक मशिदींनी लाऊडस्पीकर्स लावण्यासाठी रितसर परवानगीचे अर्ज केले होते. या मुद्द्यावरून मनसेला अपेक्षित असलेले आक्रमक आंदोलन झाले नसले तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेला काहीप्रमाणात यश मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, या सगळ्या वादात राज्य सरकारने सर्वच धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरची नियमावली बंधनकारक केल्याने अनेक देवस्थानांवरील ध्वनीक्षेपक उतरवण्याची वेळ आली होती. यामध्ये शिर्डीचे साईबाबा मंदिर आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचाही समावेश आहे.