भूमकर चौकात कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण

87

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने कार चालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.  हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. १८) सकाळी अकराच्या सुमारास भूमकर चौकात घडला.

हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार जयराम सावळकर यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेश वसंत मोगल (वय ३४, रा. इंदिरा शंकर नगरी, कोथरूड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वाहतूक पोलीस सावळकर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत भूमकर चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करीत होते. सकाळी अकराच्या सुमारास चौकातील सिग्नल लाल झाला असताना राजेश याने त्याची कार झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबवली. पादचाऱ्यांना यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी अडथळा होऊ नये, यासाठी सावळकर यांनी राजेशला कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घ्यायला सांगितले. यावरून राजेश याने सावळकर यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. यावरून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

दरम्यान, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचप नसल्याने पोलिसांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.