भूतानचे पंतप्रधान दर शनिवारी होतात डॉक्टर

267

भूतान, दि. १० (पीसीबी) – डॉक्टरांकडून रूग्णावर एखादी शस्त्रक्रिया केल्याची बाब नवी नाही. परंतु जर पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या एका डॉक्टरने जर शस्त्रक्रिया केली तर. होय… हे एगदी खरंय. पंतप्रधानपदी विराजमान असलेले भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटे शेरिंग यांनी शनिवारी भूतानमधील जिग्मे दोरजी वांगचुक नॅशनल रेफरल रुग्णालयात एका रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

लोटे शेरिंग हे साधारण व्यक्तिमत्व नसून आठवड्याच्या पहिल्या पाच दिवशी ते पंतप्रधान म्हणून तर अन्य दोन दिवस ते डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. नुकतीच त्यांनी एका रूग्णाची मूत्रपिंडाची शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे आपल्यासाठी एकप्रकारे तणावमुक्तीचा मार्ग असल्याचे म्हटले. काही लोकांना विकेंडला गोल्फ खेळायला आवडते, तर काही लोकांना तिरंदाजीसारखे खेळ खेळायला आवडतात. परंतु मला या ठिकाणी रूग्णांची सेवा करत विकेंड घालवायला आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी रूग्णांची सेवा करतच राहिन. परंतु सध्या रोज रूग्णांची सेवा करता येत नाही, याची खंत वाटते. आठवड्याच्या दिवसांमध्ये जेव्हा मी काम करतो असतो तेव्हाही अनेकदा रूग्णांच्या सेवेसाठी रूग्णालयाकडे वळण्याची इच्छा मनात येत असल्याचेही शेरिंग म्हणाले. रुग्णालयात रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतो, तर सरकारमध्ये धोरणांची तपासणी करून ती योग्यरित्या राबवण्याचे प्रयत्न करत असतो, असे त्यांनी नमूद केले.

गेल्याच वर्षी लोटे शेरिंग यांनी भूतानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही शेरिंग आठवड्यातील शनिवारचा दिवस हा रूग्णांच्या उपचारांसाठी तर गुरूवारी सकाळची वेळ प्रशिक्षणार्थी आणि डॉक्टरांना सल्ला देण्यासाठी राखून ठेवतात. तर रविवारची वेळ ते केवळ आपल्या कुटुंबासाठी राखीव ठेवतात. शेरिंग यांनी बांगलादेश, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत प्रशिक्षण घेतले असून 2013 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. परंतु त्यावेळी त्यांच्या पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.

भूतानमध्ये वैद्यकीय उपचरांसाठी थेट पैसे द्यावे लागत नाहीत. परंतु वैद्यकीय क्षेत्रात अजून बरेच काही करणे बाकी असल्याचे मत शेरिंग यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच आम्हाला हळूहळू नागरिकांना अन्य आरोग्यसेवाही पुरवण्यावर लक्ष्य केंद्रित करायचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

WhatsAppShare