भुशी धरणावर दंगा करण्यापासून रोखल्याने पोलिसाला जबर मारहाण

110

लोणावळा, दि. ९ (पीसीबी) – भुशी धरणाच्या पायऱ्यांवर एकमेकांच्या पॅन्ट ओढत दंगा घालणाऱ्या तरुणांना हटकल्याने पोलीस कर्मचार्‍याला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

सुभाष दत्तु शिंदे असे जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी राहुल लालासाहेब कदम (वय ३०), राहुल दिलीप गुणवरे (वय ३०), अतुल अंबादास गुणवरे (वय ३०), पवन शिवाजी गुणवरे (वय २८), दत्तात्रय कुंडलिक गुणवरे (वय २८ सर्व रा.स्वामी चिंचोली, गुणवरे वस्ती, दौंड पुणे) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पाचही आरोपी दौंड येथून लोणावळ्यातील भुशी धरणावर फिरायला आले होते. ते दारु पिऊन त्या ठिकाणी एकमेकांच्या पॅन्ट ओढत दंगा घातल होते.  हे पाहून धरणावर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचारी शिंदे यांनी त्या सर्वांना समज दिली. यानंतरही त्यांचा दंगा सुरु होता. यामुळे शिंदे यांनी त्यांना धरणाच्या पायर्‍यांवरुन हाकलले.

सायंकाळी सहा वाजता धरणावरील सर्व पर्यटकांना बाहेर काढत शिंदे हे पोलीस ठाण्याकडे येण्यासाठी निघाले असता कदम आणि गुणवरे यांनी संगनमत करत शिंदे यांना वेढा घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिंदे याच्या कपाळाला डोळ्याच्यावर मार लागला आहे. पोलीसांना मारहाण करत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक व काही पर्यटकांनी शिंदे यांना त्याच्या तावडीतून सोडवत दोन जणांना पकडले तर तिन जण घटनास्थळावरुन पळून गेले. या सर्वांना पोलीस पथकाने शोध घेत रात्री पडकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.