भुजबळ यांच्यासह समीर, पंकज यांना न्यायालयाचा तूर्तास दिलासा

23

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह समीर, पंकज आणि इतरांना मंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात तूर्तास दिलासा दिला आहे. या प्रकरणी ६ ऑगस्टला न्यायालय निकाल देणार आहे. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या संदर्भात ईडीने वैयक्तिक हमीवर भुजबळ यांना दिलासा दिला आहे.

भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्याच्या आधारे ईडीने पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, याचा स्वतंत्र गुन्हा म्हणून असा उल्लेख करता येणार नाही, असा बचाव छगन भुजबळ यांच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणात नवी माहिती आल्यावर प्रत्येक वेळी जामिनाकरता बाँड देणे कायदेशीररित्या योग्य ठरणार नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला.

एकाच गुन्ह्याकरता दोनदा अटक करता येणार नाही. कायद्याच्या मूलभूत तत्वाचीदेखील आठवण भुजबळांच्या वकिलांनी न्यायालयाला करुन दिली. तर ईडीने आपण पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचे मान्य केले. मात्र, त्याची दखल वेगळा गुन्हा म्हणून करण्याची विनंती ईडीने न्यायालयाला केली.