भीषण कार अपघातात काँग्रेस नगसेवकासह तिघांचा जागीच मृत्यू

2086

धुळे, दि. १४ (पीसीबी) – भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात धुळे महापालिकेतील काँग्रेस नगसेवकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ झाला.

काँग्रेस नगरसेवक कुमार डियालाणी (वय ५७) तर राजू भटेजा (वय ६८) आणि ललितकुमार भारद्वाज (वय ४७) असे अपघातात जागीच ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर रमेश कुकरेजा यांच्‍यासह अन्‍य एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास धुळ्याकडून मुंबईकडे जात असताना शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील आडगाव-पेंडरघोळजवळ चालक ललितकुमार याचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या कडेला उलटली. या कारमध्ये काँग्रेस नगरसेवक कुमार, राजू, रमेश आणि अन्य एकजण प्रवास करत होते. या अपघातात काँग्रेस नगरसेवक कुमार, राजू आणि ललित यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमेश कुकरेजा यांच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शेठे, सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पालवे, भरत गांगुर्डे, अनिल नवाल यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच तिघांचे मृतदेहही शवविच्‍छेदनासाठी रूग्‍णालयात पाठविण्‍यात आल्‍याची माहिती आहे. दरम्यान, मयत कुमार डियालाणी हे धुळे जिल्ह्यातील कुमारनगर या प्रभागाचे नगरसेवक होते.