भिन्न धर्माचे असल्यामुळे कुटूंबीयांनी केला विवाहास विरोध; विषप्राशन करुन केली प्रेमी युगलाने आत्महत्या

119

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – भिन्न धर्माचे असल्यामुळे विवाहासाठी कुटूंबीयांनी विरोध केला म्हणून घरातून पळून जाऊन एका प्रेमी युगलाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रेमी युगल मुंबईच्या मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारातील एका कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.

सलमान अफरोज आलम खान (वय २६) आणि मनीषा नेगी (वय २१) अशी या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान मुलुंड पश्चिमेकडील अशोक नगर येथे तर मनीषा नवी मुंबईतील दिघा येथे राहत होती. सलमान आणि मनीषा भांडुपच्या महाविद्यालयात शिकले. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्याबाबत दोघांच्याही पालकांना माहिती होती. मात्र धर्म भिन्न असल्याने पालकांना हे संबंध अमान्य होते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दोघे घरी गेले नव्हते. दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत माहिती असल्याने ते परस्पर लग्न करतील, या अंदाजाने खान, नेगी कुटुंबाने हरविल्याची तक्रार दिली नव्हती.

मात्र, बुधवारी पहाटे मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारात  असले्लया निळ्या रंगाच्या कारमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. गाडीत कपडय़ांनी भरलेली बॅग, छायाचित्रे, कागदपत्रे आणि विषारी द्रव्याची रिकामी बाटली आढळली. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. मृतदेह शवचिकित्सेसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. साहाय्यक आयुक्त अनिल वलझाडे तपास करत आहेत.