भारत ‘हिंदू’ पाकिस्तान होण्याचा धोका- शशी थरूर

54

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी भाजपावर जहरी टीका केल्याने भाजपाचे प्रवक्ते चांगलेच भडकले आहेत. थरुर यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी संबित पात्रा यांनी केली आहे. शरुर यांचे विधान हिंदूंचा अपमान करणारे असून भारताचीही त्यांनी लाज काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संबिता पात्रा म्हणाले, काँग्रेसने पुन्हा एकदा हिंदूंचा अपमान करीत भारताची लाज काढली आहे. काँग्रेस कायम याच मानसिकतेने काम करीत आहे. पाकिस्तानच्या निर्मितीला केवळ काँग्रेसच जबाबदार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
थरूर म्हणाले होते की, जर भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या तर आपल्या लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल. संविधानातील सर्व मुलभूत तत्वे काढून टाकण्यात येतील नवे संविधान निर्मितीचे काम सुरू होईल. त्यामुळे तयार झालेले नवे राष्ट्र हे हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतांवरच चालेल.
यामुळे अल्पसंख्यांकांमधील समानता नष्ट होईल. हे दिवस पाहण्यासाठीच महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद आणि इतर महान नेत्यांना स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला होता का?, असा सवालही त्यांनी विचारला.