‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी

67

पुणे, दि. २० (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या एकाने नव्हे, तर एका संस्थेने केली आहे आणि त्यांची राजकीय शाखा आपल्यावर राज्य करत आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा  महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी भाजप सरकारवर  साधला. नुसते भारत माता की जय बोलून काही होत नाही. तर भारत मातेवरील अत्याचारही थांबवले पाहिजे, असेही गांधी म्हणाले. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यात आज (सोमवार) ‘जवाब दो रॅली’चे आयोजन केले होते. या रॅलीनंतर तुषार गांधी बोलताना म्हणाले की, महात्मा गांधी यांची दररोज हत्या होत आहे. लोकांच्या मनात विष पेरले जात आहे. अशा विषारी विचारधारेपासून तरुणांना दूर ठेवले पाहिजे.

विषारी विचारधारेविरोधात बोलणाऱ्यांमध्ये भय निर्माण केले जात आहे. याच लोकांनी देशाची फाळणी केल्याचा आरोप त्यांनी केला. भारत माता की जय म्हणून काही होत नाही. तर भारत मातेवरील अत्याचार रोखला पाहिजे. आपण सर्वांनी देशाची जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.