‘भारत बंद’मध्ये सहभाग म्हणजे काँग्रेसला पाठिंबा नाही – आप   

111

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – वाढत्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदमध्ये इतर विरोधी पक्षांसह दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीनेही सहभाग घेतला होता. मात्र,  आम्ही मोदी सरकारच्या धोरणांविरोधात बंदमध्ये सहभागी झालो होतो, म्हणजे याचा अर्थ आमचा काँग्रेसला पाठिंबा आहे, असे गृहित धरू नका,  असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.

आपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह राजघाटावर काँग्रेसच्या आंदोलनावेळी हजर होते.  तर पक्षाच्या अन्य नेत्यांनीही जंतर-मंतरवर आंदोलन केले. यावेळी सिंह म्हणाले की,  इंधन दरवाढीला मोदी सरकारची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. आम्ही देशाच्या हितासाठी आणि मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करण्यासाठीच भारत बंदमध्ये सहभागी झालो. याचा अर्थ आमचे काँग्रेसला समर्थन आहे, असा होऊ शकत नाही. सर्व राजकीय पक्षांनी याविरोधात देशाच्या हितासाठी एकत्र यायाला हवे, असे ते म्हणाले.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ  काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. काँग्रेसच्या या बंदला २१ विरोधी पक्षांनी पाठिंबा  देत आंदोलनात भाग घेतला होता.