भारतीय गाणे गायल्याने पाकिस्तानी महिला कर्मचाऱ्यावर कारवाई

210

इस्लामाबाद, दि. ४ (पीसीबी) – भारतीय गाणे गायल्याने पाकिस्तानमधील एका महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. महिला पाकिस्तानमधील विमातनळ सुरक्षा दलाची कर्मचारी आहे. पाकिस्तानचा ध्वज असणारी टोपी घालून महिला भारतीय गाणे गात होती. विशेष म्हणजे, ती एका गाण्यावर फक्त ओठ हलवत होती. मात्र यामुळे देशाचा अपमान झाल्याचे सांगत महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.

महिला कर्मचाऱ्याचा गाणे गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. विमातनळ सुरक्षा दलाने दोन वर्षांसाठी महिलेची बढती तसेच इतर सुविधांवर बंदी आणली आहे. तिच्यावर नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यासोबतच अधिकाऱ्यांनी भविष्यात एखाद्या नियमाचे उल्लंघन केल्यास अजून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. विमातनळ सुरक्षा दल प्रशासनाने इतर कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर कोणत्याही वादग्रस्त गोष्टींमध्ये अडकू नका असे सांगितले आहे.