भारताने स्वतःची उपचार पद्धती विकसित करणे आवश्यक – डॉ. भूषण पटवर्धन

77

पिंपरी,  दि. १३ (पीसीबी) –  केवळ आधुनिक उपचार पद्धतीत वैद्यकीय शाखेच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. आयुर्वेद आणि योगा या पारंपरिक उपचार पद्धतीलाही मर्यादा आहेत. त्यामुळे पारंपरिक व आधुनिक उपचार पद्धती एकत्रित करून भारताने स्वतःची उपचार पद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे,  असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, संत श्रीमान सुमन भाई, कुलाधिपती मौनीथर्थ, माजी मंत्री बी. जे. खताल पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, विश्‍वस्त स्मिता जाधव, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पटवर्धन पुढे म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संस्थेने आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाची स्वतंत्र ओळख निश्‍चित केली आहे. त्यानुसार प्राधान्यक‘म लक्षात घेऊन प्रत्येक देशाने स्वतःची उपचार पद्धती विकसित करणे आवश्यक आहे. भारताने आपली उपचार पद्धती विकसित करताना आपली संस्कृती आणि परंपरांचा विचार करून ‘आयुष’चा समावेश करावा. आयुषमुळे लोकांना आपल्या आरोग्याची आजार होण्यापूर्वीच काळजी घेता येईल.’

कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘ज्ञान, कौशल्ये आणि त्याच्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या आमच्या यशस्वी वाटचालीच्या प्रमुख बाबी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यापीठाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक योगदान ही आमची आश्‍वासने आहेत. या क्षेत्रातील आमचे योगदान देशाच्या विकास कामात मोलाचा वाटा उचलत आहे.’

या कार्यक्रमात १४०१ विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या पदव्या बहाल करण्यात आल्या. त्यामध्ये मेडिसिन, दंतचिकित्सा, फिजोओथेरपी , नर्सिंग, ऑप्टोमेट्री, बायोटेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट डिस्टन्सलर्निंग या विभागांचा समावेश होता. २४ मानांकित विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि २५ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. त्या व्यतिरिक्त डॉक्टर ऑङ्ग लेटर्स पदवीसाठी संत श्री सुमन भाई आणि बी. जे. खताल पाटील यांना सुवर्णपदके बहाल करण्यात आली.

कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले.