भारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण

45

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – भारतात गरिबीच्या प्रमाणात झपाट्याने घसरण होत आहे. दर ४४ मिनिटाला काही भारतीय दारिद्रय रेषेतून बाहेर येत आहेत, असे एका पाहणीतून समोर आले आहे. भारतातील गरिबीचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भारत आता सर्वाधिक गरिबांची लोकसंख्या असलेला देश राहणार नाही, असे या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

ब्रुकिंग्सच्या ‘फ्युचर डेव्हल्पमेंट ब्लॉग’मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार भारतात गरिबी कमी होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारत लवकरच सर्वाधिक गरिबांची लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येईल. आतापर्यंत भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, भारतातील गरिबी घटण्याचे प्रमाण वाढत आहे.  सध्या भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून नायजेरियाने पहिल्या स्थानावर आहे. तर डेमोक्रॅटीक रिपब्लिक कांगो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लोकांना दिवसाला १२५ रुपये लागतात. मात्र, ज्या लोकांना १२५ रूपये मिळत नाहीत, ते लोक दारिद्र्य रेषेत येतात, असे या अहवालात म्हटले आहे. या अभ्यास अहवालानुसार २०२२ पर्यंत ३ टक्क्यापेक्षा कमी भारतीय गरीब असतील. तर २०३० पर्यंत भारतात अती दारिद्र्य रेषेखाली एकही व्यक्ती राहणार नाही.