भाजप सरकार मराठयांच्या विरोधात नाही – विनायक मेटे

98

पुणे, दि. ४ (पीसीबी) – राज्यातील भाजप सरकार मराठयांच्या विरोधात नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदारांनी राजीनामा देणे ही एक पळवाट आहे.  आमदारकीचा राजीनामा देण्याऐवजी विधिमंडळात आरक्षणाविषयी भूमिका मांडण्याची गरज आहे, असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले.  

पुण्यात शिवसंग्रामची राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर मेटे  पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विनायक मेटे म्हणाले की,   राज्यातील सरकारने सर्वसामान्यांच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत. मराठा समाजाच्या दृष्टीनेदेखील वसतीगृह बांधणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला ५०० कोटी रुपये देण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.

आगामी काळात सरकारसोबत राहायचे की नाही, हा निर्णय भविष्यात घेतला जाईल. मात्र सरकारचा कारभार पाहता, हे सरकार मराठयांच्या विरोधात नाही, असे ते म्हणाले. महायुतीमध्ये शिवसंग्रामवर अन्याय झाला आहे. मात्र, आम्ही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसोबत आहे, असेही  त्यांनी स्पष्ट केले.  येत्या दोन दिवसात शिवसंग्रामचे पदाधिकारी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आरक्षणाविषयी भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.