भाजप सरकारला सळो की पळो करून सोडू – पृथ्वीराज चव्हाण

400

सातारा, दि. १९ (पीसीबी) – राज्यात २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास भाजपचा पराभव शक्‍य आहे. आघाडी करून लढण्याची जबाबदारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आहे. आघाडी झाल्यास केंद्र व राज्यातील भाजप सरकारला सळो की पळो करून सोडू, असे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

सातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली येथे काँग्रेसचे नुतन आमदार विश्वजीत कदम यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्‌घाटन  करण्यात आले. यावेळी चव्हाण बोलत होते.  आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, अजित पाटील- चिखलीकर, जयवंतराव जगताप आदी उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के जनतेने मतदान केले आहे. तर उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे मतविभाजन झाले नसते, तर भाजपला सत्ता मिळाली नसती. त्यासाठी एकत्र निवडणुका लढण्याची जबाबदारी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेणे आवश्यक आहे.