भाजप माजी नगरसेवकाच्या मुलावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक

0
290

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – भाजप नगरसेवकाच्या मुलावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हल्ल्याची घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजता चिंचवडगाव येथे घडली.

सुरज हरिभाऊ तिकोणे (वय 27, रा.थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत नागेश आगज्ञान (वय 44, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी सुरज यांचे शनिवारी थेरगाव येथे भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातूनच आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ करून तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या अक्षय सूर्यवंशी याला देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केले आहे. पोलिसांनी सुरज याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.