भाजप महाराष्ट्रात स्वतंत्र लढल्यास २५ खासदार, तर शिवसेनेसोबत लढल्यास ४५ खासदार निवडून येतील

1273

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांचा अंतर्गत आढावा घेण्याचे काम सुरु केले आहे. सप्टेंबरमध्ये पूर्ण झालेल्या या आढाव्यात राज्यात भाजप स्वबळावर लढला तर गेल्या वेळेपेक्षा जास्त म्हणजे २५ जागा जिंकू शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. शिवसेनेसोबत युती झाली तर ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वेळी भाजप-शिवसेना आणि स्वाभिमानी युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. गेल्यावेळी शिवसेनेसोबत युती असताना भाजपने २३ जागांवर विजय मिळवला होता. आता २०१९ ला आणखी जास्त जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. मागील वेळेस शिवसेनेला १८ जागा, तर २००९ मध्ये ११ जागा मिळाल्या हत्या. दोन्ही वेळेला युती होती आणि शिवसेनेच्या खासदारांची संख्याही वाढली होती. मात्र आता शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपणही स्वबळावर लढलो, तर किती खासदार निवडून येऊ शकतात, याचा सर्व्हे भाजपने केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेबरोबर युतीस भाजप तयार आहे, तर दुसरीकडे राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्याचे कामही सुरू आहे. सध्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांत केंद्राच्या योजना नीट राबवल्या का, खासदाराचे काम कसे आहे, कार्यकर्त्यांचे खासदाराबाबत मत काय, याबाबत सर्व्हेमधून माहिती घेण्यात आली आहे. जिथे भाजपचा खासदार नाही तिथे पक्षवाढीसाठी काय करता येईल, मागच्या वेळी तिथे किती मते मिळाली होती, संभाव्य उमेदवार कोण असू शकेल, उमेदवार आयात करायचा का आदी बाबींचाही विचार भाजपने सर्व्हेत केलेला आहे.

दुसरीकडे शिवसेनेनेही ४८ मतदारसंघांत अंतर्गत सर्व्हे सुरू केला. काही उमेदवारही निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. फक्त मुंबई व कोकणातील उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे काम बाकी आहे. शिवसेना स्वबळावरच लढणार असून या वेळी २५ जागा जिंकू, असा विश्वास पक्षाला वाटतो आहे.