भाजप खासदाराच्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू  

355

हैदराबाद, दि. २५ (पीसीबी) – भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांच्या कारने दोन पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर आणखी एक महिला जखमी झाली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना शुक्रवारी (दि.२४) घडली. दरम्यान खासदारांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याने राव यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

खासदार जी व्ही एल नरसिंह राव हे प्रकाशम जिल्ह्यातून विजयवाडा येथे जात होते.  कोलनूकोंडा येथे दोन महिला रस्ता ओलांडत होत्या. या महिलांना राव यांच्या कारने धडक दिली. यानंतर कार दुभाजकावर जाऊन आदळली आणि तिथेच थांबली. ही धडक इतकी भीषण होती की एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. पोलिसांनी राव यांच्या चालकाला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अपघात झाला त्यावेळी मी मागच्या सीटवर झोपलो होतो. पोलीस तिथे येईपर्यंत आणि जखमींना रुग्णालयात नेईपर्यंत मी घटनास्थळीच होतो. जवळपास ४५ मिनिटे मी तिथेच होतो. लवकरच मी दोन्ही कुटुंबाची भेट घेणार आहे, असे राव यांनी सांगितले.