भाजप कार्यकर्त्यांचे चारित्र्य आणि वर्तन अटलजींसारखे आहे का? – नितीन गडकरी

217

नागपूर, दि. २६ (पीसीबी) – भाजप कार्यकर्त्यांचे चारित्र्य आणि वर्तन खरोखर अटलजींचे विचार आणि मिशनच्या जवळ जाणारे आहे का? असा सवाल केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केला. नागपूरमध्ये दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरींनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच  पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे बौध्दीक घेतले. 

पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते  स्वतःबद्दल विचार करतात. आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडत बसतात. माझे नाव पत्रिकेत छापले नाही, पातळ हार घालून माझे स्वागत केले, माझा योग्य सन्मान केला नाही, मला घ्यायला कार्यकर्ते का नाही आले, मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही, अशा मुद्द्यांवरून  पक्षात वादावादी सुरू असते, असे गडकरींनी सांगितले.

भाजपमध्ये अनेक आमदार संकुचित मनाचे आहेत. अमुक कार्यकर्त्याला मंचावर बसवू नका, त्याला पक्षात घेऊ नका, असे मुद्दे घेऊन वाद घालत बसतात. अशा छोट्या मनाने आपल्याला अटलजींच्या विचारांवर कसे चालता येईल? असा थेट सवाल गडकरींनी यावेळी केला.

अटलजी जसे खरोखर होते, तसे आपण आहोत का याचा विचार करा, अशा शब्दांत गडकरींनी कार्यकर्त्यांना सुनावले. पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डात अटलजी होते. मात्र, त्यांनी कधीच आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी पद किंवा उमेदवारी मागितली नाही. पक्षाचे अनेक निर्णय त्यांच्या इच्छेविरोधातही व्हायचे, त्यांनी कधीच त्याला विरोध केला नाही. ते त्यांच्या व्यवहारातूनही लोकशाहीचे उपासक होते, असे गडकरी यांनी सांगितले.