भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांचा राजीनामा मराठा आंदोलकांकडे सुपूर्त

172

नाशिक, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपला  राजीनामा मराठा आंदोलकांकडे सुपूर्त केला आहे. समाजाला जेव्हा गरज पडेल, तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त करावा, असे त्यांनी म्हटले आहे. वेळप्रसंगी समाजासाठी बलिदान द्यायलाही तयार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहूल आहेर यांनी आज (गुरुवारी) मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. ‘मराठा आरक्षणाच्या मागणीला माझे समर्थन असून मी मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा सोपवत आहे. समाजासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा’, असे त्यांनी आंदोलकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयातून योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजाला हक्क मिळालाच पाहिजे, या समाजाला आंदोलनाची वेळ यावी, हे दुर्दैव असून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत दिरंगाई केली जात असेल, तर सरकारने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आहेर यांनी केली.