भाजप आमदारा विरोधात अपहरणाची तक्रार

51

यवतमाळ, दि. २९ (पीसीबी) : राळेगावाचे भाजप आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या विरोधात वडकी पोलीस ठाण्यात विठ्ठल नामदेव कोवे, रा. देवधरी ता. राळेगाव या शेतकऱ्याने अपहरणाचा प्रयत्न केल्याची तक्रार केली.

गुरुवारी २५ जूनला सकाळी शेतात हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे. मात्र या घटनेला राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे प्रस्तावित सूतगिरणीच्या जमिनीचा वाद कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. एक वर्षांपूर्वी तत्कालीन भाजप सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री असताना आमदार उईके यांनी देवधरी येथे सूतगिरणीचे भूमिपूजन केले होते. या सूतगिरणीसाठी त्यांनी एका शेतकऱ्याकडून शेत खरेदी केले होते. मात्र या शेतावर कुळानुसार आपला हक्क असून सूतगिरणीने खोटय़ा दस्ताऐवजाद्वारे ते खरेदी केल्याचा तक्रारदार कोवे यांचा आरोप आहे. सूतगिरणीच्या जमिनीच्या वादाचे हे प्रकरण आहे. या संदर्भात तक्रार आली.

आ. उईके आणि माजी मंत्री पुरकें चा परस्परांवर आरोप
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच सूतगिरणीसाठी जमीन खरेदी करण्यात आली. माझ्या विरोधात अपहरणाच्या प्रयत्नाची तक्रार दाखल करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात मी कधीही गेलो नाही. तक्रारीत नमूद तारखेस मी मतदारसंघात दौऱ्यावर होतो. या प्रकरणामागे काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांचा हात आहे. माझी राजकीय गती कमी व्हावी म्हणून असे तद्दन खोटे आरोप करण्यासाठी पुरके यांनीच संबंधित तक्रारदारास पुढे केले, असा प्रतिआरोप आमदार उईके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. लोकप्रतिनिधी म्हणून विशेषाधिकारांवर गदा आणून अवमान करू पाहणाऱ्या या प्रकाराविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशाराही उईके यांनी दिला. दरम्यान, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी आमदार उईके यांना समोरासमोर पुराव्यानिशी बोलण्याचे आव्हान दिले आहे. आदिवासी बांधवांवर याच समाजाचे लोकप्रतिनिधी अन्याय करत असतील तर ते मी कधीही सहन करणार नाही. आपण विठ्ठल कोवे या शेतकऱ्यासोबत असून त्यांना न्याय मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी सांगितले.

WhatsAppShare