भाजप आमदाराच्या मुलाची काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना ठार मारण्याची धमकी

109

भोपाळ, दि. ३ (पीसीबी) – मध्य प्रदेशमधील एका भाजप आमदाराच्या मुलाने काँग्रेसचे नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना गोळी झाडून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दामोह जिल्ह्यातील हटा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार उमादेवी खटिक यांचा मुलगा प्रिन्सदिप लालचंद खटिकने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सिंधिया यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.

ज्योतिरादित्य ऐक, तुझ्या नसांमध्ये जीवाजीराव यांचे रक्त आहे. या जीवाजीरावाने बुंदेलखंडची मुलगी झांसीच्या राणीचा खून केला होता. जर उपकाशी हटामध्ये प्रवेश करून ही भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला. तर मी गोळी झाडेन, एक तर मी मरेन नाहीतर तू, असा मजकूर प्रिन्सदिपने पोस्टमध्ये टाकला आहे.

दरम्यान, काँग्रेसने सिंधिया यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. येत्या ५ सप्टेंबरला सिंधिया हे हटा जिल्ह्यात एक सभा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रिन्सदिपने ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. तर ही पोस्ट अत्यंत दुर्दैवी आहे. सिंधिया हे सन्मानीय खासदार आहेत. अशा पद्धतीची पोस्ट केली नाही पाहिजे. ही पोस्ट हटवण्यात येईल, असे उमादेवी यांनी  म्हटले आहे.