भाजपा समर्थकांसाठी शिवसेनेतर्फे मोफत बरनॉल वाटप

249

मुंबई, दि.३० (पीसीबी)- अनेकदा एखाद्या ठिकाणी भाजले किंवा जळाले तर आपण बरनॉल हे मलम लावतो. अनेकदा सोशल मीडियावरही राजकीय टीका-टिपण्णी करताना बरनॉल लावा असे उपरोधिकपणे म्हटले जाते. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळेच संतप्त झालेल्या भाजपा समर्थकांसाठी शिवसेनेने खरोखरच्या बरनॉल मलम वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

भाजपाला डावलून शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले आहे. यामुळे भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरवात केली आहे. सोशल मीडियावर यावर रंगणाऱ्या चर्चांमध्ये अनेकदा बरनॉल लावा असे उपरोधिकपणे सांगितले जात असते. वसईतील शिवसेनेने मात्र प्रत्यक्षात बरनॉल मलम वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

शिवसेनेतर्फे रविवार १ डिसेंबर रोजी नवघर माणिकपूर शाखेत हा मोफत बरनॉल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी सांगितले की, “भाजपाचे भक्त आम्ही सत्तेमुळे आल्यामुळे आमच्यावक जळत आहेत. त्यांना खरोखरच मलम लावून शांत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही हा मलम वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.” या दिवशी शिवसेनेचे आरोग्य शिबिर आहे. त्यामुळे राजकीय कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेनेही संधी साधली आहे.

WhatsAppShare