“भाजपा शिस्तप्रिय पक्ष; पक्षविरोधी कारवायांना थारा नाही”

68

– पिंपरी-चिंचवड शहर भाजपामधील घरभेद्यांना दिला इशारा

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षविरोधी कारवायांना थारा दिला जाणार नाही. पदांचा लाभ मिळवण्यासाठी पक्षाची बदनामी सहन केली जणार नाही. प्रसंगी हेकेखोरांची हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिला आहे. कोणी पक्षाला आणि नेत्यांना आव्हान देवून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा भाजपाने दिला आहे.

भाजपाचे पिंपळे निलख येथील नगरसेवक तुषार कामठे यांनी उघडपणे भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या हुकूमशाहिचा पक्षाला फटका बसू शकतो, असा इशारा देत घरचा आहेर दिला आहे. भाजपातील २२ नगरसवेक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचीही जोरदार चर्चा आहे. सत्ताधारी भाजपामध्ये त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमिवर प्रवक्ते थोरात यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षातील पक्षाविरोधात वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. वास्तविक, पक्षाने सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महत्त्वाच्या पदांसाठी काहीजण अडवणूक करुन पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे थोरात यांनी म्हटले आहे.

थोरात म्हणाले की, भाजपा पक्षाविरोधात निराधार वक्तव्य करणाऱ्यांची पर्वा राज्यातील पक्षश्रेष्ठी करणार नाहीत. भाजपा हा पक्ष महत्त्वाचा आहे. काहीही झाले, तरी भाजपाची एकहाती सत्ता येणार आहे. पक्ष म्हणून सर्वांनी एकोप्याने काम करणे अपेक्षीत आहे. पण, कोणी पक्षाला आणि नेत्यांना आव्हान देवून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही.

निष्ठावंत असल्याचा अनभाका घेणाऱ्यांनी आपली निष्ठा तपासावी…
भाजपामधील महत्त्वाच्या पदांचा लाभ न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेले काहीजण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा दावा करीत आहेत. पक्षशिस्त महत्त्वाची आहे. सर्वांनी पक्ष आणि संघटन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर मांडून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. निष्ठावंत म्हणून प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी आपली निष्ठा तपासावी. निष्ठावंत भाजपाची कधीच बदनामी करणार नाहीत, असा दुजोराही थोरात यांनी दिला आहे.

WhatsAppShare