‘भाजपा विरुध्द राष्ट्रवादी संघर्ष उफाळला’- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रोटोकॉल न पाळल्याने पंतप्रधान आवास योजनेतील घरांची सोडत रद्द करण्याची भाजपावर मोठी नामुष्की

22

– राष्ट्रवादी काँग्रेसची रस्त्यावर जोरदार निदर्षने
– महापालिका भवनसमोर भाजपाकडून आंदोलन

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने थेट राज्याच्या प्रधान सचिवांनी स्थगिती दिल्याने पंतप्रधान आवास योजनेखालील घरांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित सोडतीचा कार्यक्रम गुंडाळण्याची वेळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर आली. दरम्यान, प्रोटोकॉल नुसार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमाला रितसर निमंत्रण न दिल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या बाहेर रस्त्यावर अर्धा तास जोरदार निदर्षने केली. दुसरीकडे केवळ श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने प्रशासनाला हाताशी धरून कार्यक्रम रद्द केला असा आरोप करत भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्त कक्षाबाहेर धरणे आंदोलन केले.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोशीतील बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली आणि रावेत येथे तीन मोठे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. ३ हजार ६६४ घरांची निर्मिती कऱण्याचे काम वेगात सुरू आहे. या घरांसाठी ४७ हजार ८७८ अर्ज आले, त्यापैकी ७७ अर्ज बाद झाले आणि उर्वरीत पात्र ठरले. पाच हजार रुपये अनामत सह सुमारे सव्वा दोन कोटी रुपये जमा झाले. आज दुपारी तीन वाजता या अर्जातून सोडत (लकी ड्रॉ) काढण्यात येणार होती. संगणक सोडतीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. स्वप्नातील घर मिळते का ते पाहण्यासाठी या सोडत कार्यक्रमाला प्रेक्षागृहात सुमारे दोन हजार नागरिकांनी गर्दी केली होती. बाहेर आवारात आणि रस्त्यावरही हजारो नागरिक उभे होते. प्रत्यक्षात राजकीय वादात सोडतच रद्द झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिक निघून गेले.

‘भाजपानेच राजकारण केले’– संजोग वाघेरे
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने प्रोटोकॉल पाळला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रितसर निमंत्रण दिले पाहिजे होते. या शहरात घरकूल योजना सर्वप्रथम दादांनी आणली हे विसरता येणार नाही. भाजपाने या सोडत कार्यक्रमासाठी निव्वळ राजकारण केले. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, रावेत च्या जागेवर स्टे आहे. त्याशिवाय जोवर बांधकाम ९० टक्के होत नाही तोवर सोडत काढणे चुकिचे होते. आज अवघे १० टक्केच बांधकाम पूर्ण आहे. आम्हाला यात कुठलेही राजकारण करायचे नाही. गोरगरिबांना स्वप्नातील घर मिळाले पाहिजे यासाठी राष्ट्रवादीनेच प्रयत्न केले. या कार्यक्रमाला अजित पवार यांना रितसर निमंत्रण द्यावे म्हणून महापौरांना वारंवार सांगितले होते. भाजपाला सत्तेचा माज आलाय. शेजारी पुणे शहरात भाजपाचीच सत्ता आहे, तिथे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे प्रत्येक कार्यक्रमाला असतात मग इथे काय दुखते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा या शहराशी काय संबंध आहे म्हणून त्यांना बालावता, असा सवाल वाघेरे यांनी उपस्थित केला.

‘भाजपा नगरसेवकांचा आयुक्तांकडे घेराव’ –
राष्ट्रवादीने महापालिका प्रशासनावर दबाव आणून सोडत कार्यक्रम रद्द करायला लावला असा आरोप करत निषेध म्हणून सर्व भाजपा नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या कक्षाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत घेराव आंदोलन केले. महापौर माई ढोरे, सत्ताधारीनेते नामदेव ढाके, माजी सत्ताधारीनेते व जेष्ठ नगरसेवक एकनाथ पवार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांच्यासह सर्व भाजपा नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला.

‘राष्ट्रवादीने श्रेयवादासाठी कार्यक्रम रद्द केला’ – एकनाथ पवार
राज शिष्टाचाराचे पालन झाले नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर एकनाथ पवार, नामदेव ढाके आणि महापौर ढोरे यांनी जोरदार टीका करत प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पवार म्हणाले, यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट होते आणि या महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळी कधी प्रोटोकॉल पाळला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला क्रेडीट मिळणार नाही म्हणून गरिबांना घरांपासून वंचित ठेवण्याचे काम त्यांनी केले. प्रशासनावर दबाव आणून हा कार्यक्रम रद्द करायला लावले म्हणून प्रशासनाचा निषेध करतो.

‘लवकरच स्वतंत्र विशेष महासभा घेणार’ – महापौर ढोरे
अजित पवार यांच्या हस्तेच कार्यक्रम व्हावा या हट्टापोटी कार्यक्रम रद्द केला गेला, असा आरोप सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी केला तर, महापौर माई ढोरे यांनीही आपल्या भाषणात नाराजी व्यक्त करताना, घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांचा राष्ट्रवादीने अपेक्षाभंग केला. आता या विषयावर स्वतंत्र सर्वसाधारण सभा लवकरच घेणार.

‘…तर प्रशासनावर हक्कभंग आला असता’ 
राजशिष्टाचारा नुसार अजित पवार यांना विश्वासात न घेता सोडत कार्यक्रम घेतला असता तर महापालिका प्रशासनावर हक्कभंग आला असता. हा बाका प्रसंग टाळण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तीन दिवस खूप प्रयत्न केले, पण समेट झाला नाही. महापौर ढोरे यांनी अजित पवार यांच्याशी निमंत्रणाबाबत रितसर बोलावे म्हणून हार्डीकर यांनी तीन दिवस प्रयत्न केले. अखेर आज दुपारी पवार आणि ढोरे यांच्यात तो औपचारीक संवाद झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळे अभावी शक्य नसल्याचे सांगतानाच, ही पध्दत नाही आणि राज्य सरकारचा पैसा या प्रकल्पासाठी असतो हे लक्षात ठेवा असेही खडे बोल सुनावले.

WhatsAppShare