भाजपा मंत्री, आमदारांना समाजवादी पक्षात `नो एन्ट्री`

0
310

लखनौ, दि. १५ (पीसीबी) : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपच्या मंत्र्यांसह काही आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप नेत्यांसाठी आता नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे. भाजपमधील एकाही नेत्याला प्रवेश न देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

भाजपला धक्के देत समाजवादी पक्षाने फोडाफोडीच्या राजकारणात मोठी आघाडी घेतली आहे. अनेक भाजप नेते समाजवादी पक्षात दाखल होत आहेत. आता यापुढे भाजप नेत्यांना पक्षाचे दरवाजे बंद करण्याची घोषणा अखिलेश यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यामुळे आगामी काळात भाजपमधून समाजवादी पक्षात दाखल होणाऱ्या नेत्यांची गर्दी कमी होणार आहे.

भाजपचा कोणाताही आमदार, मंत्री यांना मी पक्षात घेणार नाही. भाजपला कुणाचे तिकिट नाकारायचे असेल ते नाकारू द्या, असे यादव म्हणाले. भीम आर्मीशी जागावाटपाच्या फिसकटलेल्या चर्चेबाबत ते म्हणाले की, मी त्यांना दोन जागा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना कुणाचा तरी फोन आला आणि त्यांनी आघाडीत सहभागी होण्यास नकार दिला.

समाजवादी पक्षाच्या कार्यालयासमोर काल (ता.14) झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. समाजवादी पक्षाकडून या कार्यक्रमाला व्हर्चुअल सभा असे नाव दिले होते. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये कोरोनाच्या नियमांचे पालनही करण्यात आले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनाही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.